तो प्रवास सुंदर होता...

२९ डिसेंबर, २००९. माझ्या टीम मध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. थोडी ठेंगणी, मध्यम बांधा आणि कुरळे केस. लांबून बघताना छोटीखुरी वाटायची. पण जवळून पाहताना बारा गावं फिरून आल्यावर अनुभवांनी येणारा समृध्दपणा जाणवायचा. पेहेराव नीटनेटका.

ती नुकतीच काही महिने आधी भारतात परत आली होती. तिच्या बहिणीला MBBS इंटर्नशिपसाठी मुंबई बाहेर जायला लागणार होत. घरी आईच्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी चालू झाल्या होत्या. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ती भारतात परत आली होती आणि अखेर तिला टाटा कम्युनिकेशनमध्ये नोकरी मिळाली. मला ह्या मुलीचं मोठं कौतुक वाटलं होत. अमेरिकेतली यशस्वी आणि मोठया पगाराची नोकरी सोडून येणं ही सोपी गोष्ट नव्हती. बंदीमें कुछ तो दम हैं!

आम्ही दोघी एकाच टीम मध्ये होतो. कामाचं स्वरूप सारखं होत. त्यामुळे कामामध्ये येणारे सगळे उतार चढाव सारखेच होते. दोघीही कामात तत्पर होतो, एकमेकींना मदत करण्याचा स्वभाव होता, बोलायला मोकळ्या ढाकळ्या होतो. आम्हाला कळलंच नाही की आम्ही कधी जीवश्च कंठश्च मैत्रीणी बनलो. सगळेजण म्हणतात की ऑफिसमध्ये मैत्री होणं विरळाच. पण आमचा त्याला अपवाद होता. मग तुम्ही आम्हाला चंगू मंगू म्हणा किंवा जय विरू म्हणा.

तिने ठाण्यामध्ये नवीन फ्लॅट घेतला होता. त्याच काळात एसी बस सेवा चालू झाली होती. आम्ही दोघींनी AS 5 या बसने एकत्र प्रवास करायला सुरुवात केली. आधी आम्ही ऑफिसमध्ये एकत्र असायचो. आता येता जाता एकत्र प्रवासही चालू झाला. या काळात आमची मैत्री अजूनच बहरली.

आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या होत्या. दोघींना वाचनाची आवड होती. दोघीही अनेक विषयावर वाचायचो. कथा, कादंबऱ्या, तत्त्वज्ञान... कुठल्याच विषयाचं वावड नव्हतं. दोघींनाही खरेदीची आवड होती.आम्ही किती तरी वेळा ऑफिसमधून खरेदीसाठी जायचो. 

आमच्यामध्ये साधर्म्य असण्यात नियतीचाही हात होता. जसं की
१. आमच्या दोघींच्याही आजोबांनी दोन लग्न केली होती 
२. आमच्या दोघींचेही वडील दुसऱ्या पत्नीचं ज्येष्ठ अपत्य होते 
३. आमच्या दोघींकडे आम्ही २ बहिणी होतो. आम्हाला दोघींनाही सख्खा भाऊ नव्हता.
४. आम्ही दोघीही मोठ्या मुली होतो.
५. आमच्यात आणि आमच्या बहिणीमध्ये ६ वर्षाचं अंतर होतं 
६. आम्ही दोघींनीही आमच्या छोट्या बहिणीच नाव ठेवायचा हट्ट केला होता. तिने छोट्या बहिणीच नाव रुपल ठेवलं आणि मी रुपाली.
७. आम्ही दोघीही सीए, सिसा होतो आणि आमच्या दोघींच्याही बहिणी नावापुढे डॉक्टर अशी उपाधी लावतात. मग भले एक MBBS डॉक्टर आहे आणि दुसरी PhD डॉक्टर.

इतकं कशाला आम्ही एकदा तनिष्कची सोन्याची भिशी लावली होती तेव्हा एकमेकींशी न बोलताही आम्ही दोन वेगळ्या शाखांमध्ये जाऊन एकाच घडणीची चेन खरेदी केली. आमची ही यादी न संपणारी आहे. उगीच नाही ती मला soul sister म्हणायची. आमच्या दोघींसाठी soul sisters आणि twin souls असे शब्द ती नेहेमी वापरायची. 

तिच्याकडे आई आजारी राहायची आणि माझ्याकडे छोटा दीड दोन वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे आम्हाला ऑफिसचा सोडून एरव्ही वेळ काढायला कठीण जायचं. आम्ही कधीतरी एकत्र बुट्टी मारायचो आणि अख्खा दिवस एकत्र घालावयचो. एकजण planned leave घेणार आणि दुसरा sick leave घेणार. आमचा कार्यक्रम ठरलेला होता. पूर्वी आम्ही निर्मल लाईफस्टाईल आणि नंतर आर सिटी मॉलला भेटायचो. बहुतेक वेळेला शुक्रवारी. त्या दिवशी जो चित्रपट लागला असेल तो बघायचा. अगदी हाऊसफुल्ल ३ असला तरी. मग जेवण. नंतर खरेदी. शेवटी कॉफी किंवा आइसक्रीम आणि संध्याकाळी घरी रवाना. हे सगळे आमच्या दोघींसाठीही सोनेरी दिवस होते. ना घराची काळजी ना ऑफिसची चिंता. अखंड गप्पांचा फड रंगलेला असायचा. 

आम्ही दोघीही दिघी ऑफिसला जायला एका पायावर तयार. पुण्यात माझं माहेर असूनही मी घरी न जाता ऑफिसच्या गेस्ट हाऊस वर राहायचे. तिचा कुलुपांबरोबर आणि माझा नळांबरोबर ३६ चा आकडा होता. त्यामुळे कुठेही हॉटेल गेस्ट हाऊस वर गेलं की मी दार उघडणे बंद करण्याची जबाबदारी घ्यायचे आणि ती गरम पाणी, नळ, गिझर बघायची.

हे गेस्ट हाऊस आमच्या ऑफिसच्या आवारात होतं. त्यामुळे दिवसभर काम झाल्यावर आमच्या गप्पा रंगून जायच्या. आमच्या गप्पांना कुठल्याच विषयाचं बंधन नव्हतं. घर, पुस्तकं, आमचे छंद, ऑफिस, बॉस, आमचं खाजगी आयुष्य, लग्न न करण्याची कारणं, पूर्वायुष्यात भेटलेली मुलं, सेक्स, क्रश, कंपनियनशिपबद्दल मत, मद्यपान, anything and everything under the sun... कितीही लिहिलं तरी खूप सांगायचं राहूनच गेलं असं वाटतं.  

तिला नीटनेटक रहायला आवडायचं. मेकअप फारसा नसायचा. पण eye liner आणि lipstick मात्र नियमितपणे लावलेली असायची. ऑफिसमध्ये बहुतांश वेळा पंजाबी ड्रेस वापरायची. खूप मोठ्या अंतरालानंतर आम्ही जीन्सची खरेदी केली. लेग्गिंग्ज हा प्रकार एकत्र वापरून पहिला.

ती एकटी सगळीकडे भटकायची, कामं करायची. तिला तिच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव होती. बहिणीवर खूप जीव होता. तिच्या भाच्या म्हणजे तर तीच जीव की प्राण. बाबा हा तर खूप जिव्हाळ्याचा विषय. तिचे बाबा खूप लवकर गेले. पण बाबांचा उल्लेख नेहेमी असायचा. जणू त्यांचा अवती भवती वावर आहे असंच वाटायचं. तिच्या शिरावर जबाबदाऱ्या खूप होत्या पण तिने कधी त्याचा बाऊ केला नाही की तिला त्या सगळ्याच कधी ओझ वाटलं नाही. 

ती खूप धीराची होती. तिची जेव्हा शस्त्रक्रिया झाली तेव्हाही सगळी हकीगत अशा काही स्वरात सांगितली की वाटावं की दुसऱ्या कुणाच्या तरी आजाराबद्दल सांगत आहे. ती जे काही ताटात वाढून ठेवलेलं होतं त्याला तोंड द्यायला सदैव सज्ज होती. ती नेहेमी म्हणायची, "देव आपल्याला जेवढं झेपेल एवढंच देतो. जेव्हा आपल्या सहनशक्ती पलीकडे जाईल तेव्हा उचलून नेतो" तिने मला भेटायला नकार दिला. मला म्हणाली, "माझी इच्छा नाही तू मला या अवस्थेत पहावस. तुझ्या स्मरणात माझी सदैव फ्रेश छान छबी रहायला हवी" आज मागे वळून बघताना वाटतं की तिला आधीच अघटिताची चाहूल लागली होती का...

१० मेला नक्की काय झालं हे विचारायची माझी हिम्मतच झाली नाही. तिची सहनशक्ती संपली असणार एवढं एकच उत्तर आहे. आमची मैत्री म्हणजे "ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे.." ती तिचा शब्द अशा प्रकारे पाळेल असं वाटलं नव्हतं. आज मागे वळून बघताना एवढंच म्हणू शकते - तो प्रवास सुंदर होता.......



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Hilarious Hot.....

शक्तिमान