शक्तिमान
२००२ मध्ये मी पहिल्यांदा हिमालयात गिर्यारोहणासाठी जायचं ठरवलं. ही माझी पाहिलीच वेळ असल्यामुळे मनात थोडी भीती होती. आपल्याला हे जमेल की नाही अशी घालमेल सुरू होती. तेव्हाच कधीतरी युवाशक्तीने गिर्यारोहकांना माहिती देण्यासाठी मेळावा आयोजित केला. तिथे आमचे ग्रुप लीडर पण उपस्थित होते. तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. उभा चेहेरा, मोठे बोलके डोळे, सावळा वर्ण, चांगली उंची आणि मध्यम बांधा. त्याला बघितल्यावर मनात पहिला विचार तरळून गेला की ट्रेकला गेल्यावर कुठे पडले झडले किंवा पायबिय घसरला तर हा माणूस निश्चित आपल्याला हात देऊ शकेल. गडी तसा हट्टाकट्टा वाटत होता. त्याच नाव काही का असेना पण मी त्याला शक्तिमान असं नाव मनोमन देऊन टाकलं. त्याला पाहून मन थोडं आश्वस्त झालं.
नंतर भेट झाली ती थेट पुणे स्टेशनवर. अंगात टी शर्ट आणि ट्रॅक पँट, पायात शूज, डोक्यावर कॅप... आम्ही सगळे प्रवासाला साजेशा कपड्यात होतो. आम्हाला प्रत्यक्ष गिर्यारोहण करताना लागणाऱ्या सॅक नंतर देण्यात येणार होत्या. त्यामुळे आमच्याकडे साध्या बॅग होत्या. पण तो मात्र पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याला बघून असं वाटलं की बस आता अर्ध्या तासात गिर्यारोहणाला सुरुवात होणार. आम्ही दिल्ली, डेहराडून असा प्रवास करत अखेर बेसकँपला पोहोचलो. आता मात्र त्याला हुरूप आला.
पहिल्या दिवसाचा ट्रेक पूर्ण झाला आणि मी पूर्ण आश्वस्त होऊन गेले की आता आपला ट्रेक निश्चित पूर्ण होणार. आम्ही आपल्या परीने चालत होतो. पण तो मात्र सगळे जण नीट चालत आहेत ना, कुणाला काही त्रास होत नाहीये ना, कुणी पडलं झडलं तर त्या सगळ्याकडे लक्ष देऊन होता. कधी थोडा पुढे, कधी मागे... त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.
पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर इतर लोक थकून भागून आडवे होण्याच्या मार्गावर असायचे. पण तो मात्र कुणाला अशा आडवेळी झोपू द्यायचा नाही. ज्यांना हिमालयातल्या हवेची, गिर्यारोहणाची सवय नाही अशा लोकांचे सांधे अखडू शकतात. मग पत्ते किंवा गप्पांचा फड जमायचा. रात्री कॅम्प फायरला अजून मजा यायची. तो उत्तम गाणी गायचा. विशेषतः किशोर कुमारची गाणी तर फार सुंदर म्हणायचा. एकदा तर मला आठवतं ओस्ला कॅम्पच्या मागे एक नदी होती. त्या नदीला फार खळाळ होता. नदी ओलांडण्यासाठी एक छोटा लाकडी पूल होता. चालत जाता येईल असा. तसं तिथे चिटपाखरूही नसायचं. गेला तर एखादा गुराखी त्याच्या १-२ गायी घेऊन जायचा. आम्ही ५-६ उत्साही मंडळी त्या पुलावर मधोमध जाऊन फतकल मारून बसलो आणि तिथे गाण्याची जी महफिल जमली की काही विचारू नका. अर्थातच शक्तिमान हा त्याचा म्होरक्या होता हे वेगळे सांगायला नको.
पुण्याला आल्यावर पण हा गप्पांचा सिलसिला आणि गाण्यांच्या महफिली अशाच सुरू राहिल्या. एकदा मला आठवतं पावसाळ्यातल्या एका ओल्या रात्री पावसाची अगदी बारीक भुरभुर चालू असताना महापालिकेच्या समोरच्या पुलावर आमची गाण्याची महिफिल जमली होती. पुलावर फार वर्दळ नव्हती पण येणारे जाणारे वळून वळून आमच्या कंपूकडे बघत होते.
तो बँकेत काम करायचा. पण गिर्यारोहण हे त्याचं पहिलं प्रेम होतं आणि गाणं हे त्याचं दुसरं प्रेम होतं. त्याच्याकडे बघून असं वाटायचं की तो त्याचे हे छंद जोपासण्यासठी जे धन लागतं ते कमावण्यासाठी नोकरी करतो. त्यासाठी त्याने किती तरी वेळा बढती नाकारली होती. त्याच्या घरी कराओकेवर गाणी रेकॉर्ड करण्याची सोय होती. तो बँकेतरफे अनेक गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. त्याने मला त्याच्या गाण्यांची कॅसेटपण बनवून दिली होती. त्या कॅसेट मधली सगळी गाणी आपसूकच जिव्हाळ्याची होऊन गेली आहेत. आता ती कॅसेट तर शिल्लक नाही पण आठवणी मात्र अजूनही हिरव्या आहेत. त्याने गायलेल गाणं लागलं की समोर असणाऱ्या व्यक्तीला मी एकदा तरी ऐकवतेच की हे गाणं माझ्या मित्राने मला रेकॉर्ड करून दिलं होत. एव्हाना माझ्या घरच्यांना त्याने मला रेकॉर्ड करून दिलेल्या गाण्यांची यादी तोंडपाठ झाली आहे. पुढे पुढे त्यांचा कराओके वर गाणी सादर करणाऱ्यांचा गट बनला आणि त्यांनी गाण्याचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.
त्याच्या घराच्या मागे ARAI ची टेकडी होती. तो रोज तिथे फिरायला जायचा. त्याच्या घराच्या खिडकीतून हिरव्यागार टेकडीच्या माथ्यावर पसरलेली कलती उन्हं फार सुंदर दिसायची. मी नेहेमी म्हणायचे की तू जर कधी हा फ्लॅट विकायला काढलास तर मला नक्की विचार. आणि त्याने विचारलंही. मला तेव्हा ते शक्य झालं नाही ही गोष्ट वेगळी. पण त्याने मात्र मला दिलेलं वचन पाळल.
तो आधी बरीच वर्ष पुण्यात एकटा राहायचा. मध्ये एखाद वर्ष त्याचा मुलगा राहून गेला. वय झालं तसं आई वडील पण पुण्यात आले. एव्हाना त्याने बँकमधून स्वेच्छा निवृत्ती घेतली. आता त्याने पूर्ण त्याच्या छंदाना वाहून घेतलं. कधी गिर्यारोहण, कधी गाण्याचा सराव, कधी कार्यक्रम, कधी कट्टा... तो आधी होता त्यापेक्षाही अधिक व्यस्त झाला.
आमची मैत्री आता जवळ जवळ २२ वर्ष जुनी आहे. आताशा आमच्या कामामुळे भेटीगाठी फार तुरळक झाल्या आहेत. पण आमचे अनुबंध फार घट्ट जुळलेले आहेत. त्यामुळे नात पूर्वी इतकंच तरल आणि ताजं हिरव टवटवीत आहे. ते रम्य क्षण मनाच्या गाभ्यात एका कुपीत कायमचे बंदिस्त झाले आहेत. जेव्हा कधी ती कुपी उघडली जाते तेव्हा त्या कस्तुरीचा मंद दरवळ मनभर दरवळतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा