ताटातलं वादळ
माणसाची कशी मजा असते पहा ना. त्याला जे बघण्याची इच्छा असते तेच त्याला दिसत. ज्या गोष्टीचा त्याच्या मनात त्याच्या मनात विचार नाही अशी गोष्ट कितीही ढळढळीत असली, कितीही ढगांच्या म्युझिक वरती डिस्को करत असली तरी ती त्याला दिसेलच याची खात्री देता येत नाही.

उदाहरणच द्यायचं झालं तर आपण नवीन कपडे घातले की इतरांनी घातलेल्या कपड्यांकडे आपसूकच आपलं लक्ष जायला लागतं. नुसत लक्षच जात नाही तर कळत नकळत आपण त्यावर आपला अभिप्राय पण द्यायला लागतो. वास्तविक रस्त्यावरून जाणारा माणूस ना ओळखीचा ना पाळखीचा. मग तो काळा असो की गोरा, त्याचे कपडे भडक रंगाचे असोत की सौम्य रंगाचे असोत, ते त्याला शोभून दिसोत अगर न दिसोत. आपल्याला त्यामुळे काय फरक पडेल? काहीच नाही. पण इतका तार्किक विचार केला tar त्याला मन कशाला म्हणायचं? किंबहुना अशा बाबतीत बुद्धीच्या विरोधात चालतं त्यालाच मन म्हणायला हरकत नाही.
मी माझ्या मनाचं असं धावणं अनेक वेळा बघितलं आहे. नवीन कार घेतली तेव्हा बघितलं, नवीन कपडे घातले तेव्हा बघितलं, नवीन घरात रहायला आले तेव्हा बघितलं. मनाला आवरायचा प्रयत्न केला. पण बहिणाबाईनी आपल्या कवितेत म्हंटल आहे तसच झालं -
मन वढाय वढाय
उभ्या पिकायला ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर...
माझ्या मनाच्या या धावण्यामुळे मी सध्या नवीनच पेचप्रसंगात सापडले आहे. सध्या माझ्याकडे ताटातले वादळ निर्माण झालं आहे. म्हणजे त्याचं असं झालं की मी वर्षानुवर्ष अथक परिश्रम करून शरीर संपदा कमावलेली आहे. ती कमावण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागली म्हणुन सांगू....
म्हणजे आपण किलोवर किलो कमावत आहोत अशी मनाला टोचणी लागेपर्यंत वजनाचा काटा 77 पर्यंत जाऊन पोहोचला होता. हळूहळू ओळखीच्या लोकांकडून प्रतिक्रिया ऐकायची मिळायला लागल्या. मग मी माझं मन घट्ट करण्यासाठी किती मेहेनत केली असेल हे सांगायला नको. अखेर निंदेकडे दुर्लक्ष करायला शिकणं हे संतांचं लक्षण पण मी प्रयत्न पूर्वक अंगी बाणवल.
लोकांकडे दुर्लक्ष केलं पण काट्याकडे कसं दुर्लक्ष करणार? मग खूप दिवस काट्याकडे न बघण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम इतकाच झाला की खोलीत पाउल टाकल्यावर पहिली नजर वजन काटा ठेवलेल्या हिरव्या खोक्याकडे जायला लागली. अखेर माझ्या छोट्या मुलानेच त्याचा काटा काढला. त्याने वजन काट्यावर चार दोन धाडधाड उड्या मारल्या आणि वजन काट्याचा सोक्षमोक्ष लावून टाकला. उत्तम शरीर संपदा कमावण्यामधला हा अडसर दूर झाला. इतरत्र गेल्यावर वजन काट्याकडे न पाहाणं तितकसं कठीण नव्हतं.
एव्हाना कंबरेचा कमरा बनला होता. पण मी काही कच खाणार्यातली नव्हते. उन्हाळ्यात दाबून आंबे खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, नवीन नोकरी लागली त्या खुषीमध्ये मस्त पिझ्झा खाल्ला, चायनीज खाऊन पार्टी साजरी केली. असा हानीकारक दिनक्रम दीर्घ काळापर्यंत चालू ठेवण्यात सातत्य दाखवलं. जिम असणारा रस्ता टाळून दुसर्या रस्त्यावरून जायला सुरुवात केली. "जिस गली मे एक भी जिम हो साधना उस गली से हें तो गुजरना नही.." असं म्हणायला सुरुवात केली. एवढंच काय पण टीव्हीवरच्या 36-24-36 अभिनेत्री बघून मनात कुठल्याही प्रकारच गंड निर्माण होऊ नये म्हणून टीव्ही पाहणं बंद केलं. आता सांगा की स्त्री असून डेली सोप वर पाणी सोडणं ही काही सोपी गोष्ट आहे?
या सगळ्यावरची कडी म्हणजे मी माझ्या मनाला सकारात्मक विचार (positive thinking) करण्याची आणि इतरांमधली फक्त चांगली बाजू पाहण्याचा सवय लावली. म्हणजे जस की मी लोकल मधून प्रवास करताना एकदा एका बाईच्या वाटेत उभी होते. मला धक्का मारून जाण्याचा तिचा प्रयत्न मी हाणून पाडला तेव्हा ती बाई माझ्यावर जबरदस्त भडकली आणि ओरडली "बघा ऐरावत कसा वाटेत उभा आहे!" असं म्हंटल्यावर तिचा राग यायच्या ऐवजी मला तिच्या कल्पनाशक्तीच कौतुक वाटलं. जाड व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या एव्हढ्या उपमा आहेत पण ऐरावत?? हे एकदम ओरिजिनल होतं.
शिवाय मी स्वतःच्या मनाला किती समजावलं असेल याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. हे dieting वगैरे करून आपल्याला का anorexic व्हायचं आहे. शेवटी जिथे चरबी असायला हवी तिथे असलीच पाहिजे (किती हा प्रश्न गौण आहे हे का मी वेगळं सांगायला पाहिजे?) नाही तर इथून तिथून हाड टोचायची. असं होऊ द्यायला मी थोडीच हडळ आहे. अशी मी अपरंपार मेहनत केली आणि एक दिवस...
दगा! दगा!! ज्या मनाच्या प्रेरणेमुळे मी एवढी भारावून जाऊन मेहनत केली त्या मनानेच मला दगा दिला. माझ्या मैत्रिणीचं ब्लड प्रेशर जास्त आलं. तिला वजन कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. आता ती पडली माझी एकदम जवळची मैत्रीण. तिने दुधातून एक supplement घ्यायला सुरुवात केली. तिचं वजन त्यामुळे किती कमी झालं किंवा तिचा हा उपक्रम किती दिवस टिकला ही गोष्ट अलाहिदा. पण त्यातच कुठे तरी या वादळाच बीज पेरलं गेलं असावं असं वाटत.
या घटनेनंतर मधून मधून फिटनेसच्या लाटा किनार्यावर येऊन धडकायला लागल्या. पहिली लाट येऊन धडकली ती उन्हाळ्याच्या दिवसात. आम्ही दोघींनी आमचं पहिलं प्रेम "Mango Milkshake without ice and with extra sugar" यावर पाणी सोडलं. दररोज मोठा ग्लास रिव्हर्स आम्ही ज्यूसच्या काऊंटर कडे फिरकण बंद केलं. नेहेमीच्या गिर्हाईक असल्यामुळे ज्यूसवाला ओळखत होता. तो रोज आमच्याकडे आशाळभूत नजरेने बघायचा. पण आम्ही आमच्या निश्चयावर ठाम होतो. "गेले ते दिन गेले" असं म्हणत "Mango Milkshake without ice and with extra sugar" च्या आठवणीनी नॉस्टॅल्जिक होऊन जायचो. अखेर एक दिवस घात झाला. ज्यूस वाल्याने खास हाक मारून सांगितलं, "मॅडम, आज हापूस है ". अखेर आमचा निश्चयाचा महामेरू डळमळला आणि आम्ही अख्खा ग्लास एका दमात रिचवला.मग मधून मधून लोकांच्या पोटात दुखायला नको असा जनकल्याणाचा उदात्त विचार करून हंगाम संपेपर्यंत "Mango Milkshake without ice and with extra sugar" पीतच राहिलो. काही दिवस निवांत तृप्तीमध्ये गेले.
त्यानंतर फिटनेसची दुसरी लाट येऊन आदळली. माझ्या मैत्रिणीच्या वाचनात GM कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी केलेला detoxification प्लॅन आला. तो 7 दिवसासाठीचा डायट प्लॅन होता. मी ही या प्रकारचा प्लॅन बघितला होता. पण to मांसाहारी लोकांसाठी होता. तिने त्या प्लॅनचा विषय काढताच मी मांसाहार करत नाही असं सांगून नकाराधिकार वापरण्याचा प्रयत्न केला. पण तिने पूर्ण प्लॅन माझ्या समोर ठेवला. तो पूर्ण शाकाहारी बेत होता. आता नाही म्हणण्याला काही कारणच उरलं नाही. अखेर मी शरणागती पत्करली.
माझी गाडी थोडी starting trouble देणारी आहे खरी. पण बाकी काही म्हणा पण बायका उपक्रमशील असतात. त्यामुळे एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती उत्साहाने पार पाडायची असं ब्रीद मनात बाळगून जय्यत तयारी सुरू झाली. तीन आठवड्या नंतरचा सोमवार धरधरण्याच नक्की केलं. मग दिवसवार आपण काय खाऊ शकतो ह्याची चर्चा केली. त्यापैकी कोणत्या गोष्टी सहजासहजी बाजारात मिळू शकतात यावर विचार विनिमय केला. मग आम्ही तपशीलवार बेत लिहून काढला. त्यापैकी कुठल्या गोष्टी तिने आणायच्या आणि कोणत्या गोष्टी मी आणायच्या हे ठरवून घेतल. कुठल्या गोष्टी कच्च्या खायच्या, कोणत्या गोष्टी शिजवून खायच्या, शिजवून खायच्या गोष्टींची पाककृती निश्चित केली. अशी सगळी तयारी केल्यावर आमची मनोमन खात्रीच पटली की आता 8 दिवसानी आपण किमान 5 किलोनी हलक्या. व्वा! क्या बात है! आता काही महिन्यातच आम्ही ऐरावत पासून गजगामिनी बनण्याची दिवास्वप्न बघायला लागलो. आता आमचे सगळे उद्योग ऑफिस चालू असताना सुरू होते. लोकानी त्यावरून छेडलं तर काय थाप मारायची हे ठरवलं. कुठलंस व्रत त्यासाठी शोधून काढलं. अशा प्रकारे शारिरीक आणि मानसिक तयारी सर्वार्थाने पूर्ण झाली आणि अखेर तो सोमवार उजाडला.
वीकेंडला आठवडाभर लागणार्या सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या होत्या. पहिल्या दिवशी फलाहार असल्यामुळे दोघींनीही नाष्ट्याला भरपूर फळं खाल्ली. ऑफिसमधे आलो. चेहर्यावरची विजयी मुद्रा पाहिल्यावर आम्ही समजायच ते समजलो. सगळं काही आलबेल असल्याची ती खूण होती. एकमेकींनी नाश्त्यामध्ये कोणती फळं खाल्ली यावर सविस्तर चर्चा केली. डब्यामध्ये कोणती फळं आणली याचा अदमास घेतला. आमची विजयी मुद्रा आणि एकमेकींसाठी असणार हसू 11:30 वाजेपर्यंत टिकलं.
सगळं ठरवल्याप्रमाणे घडलं असतं तर हा लिहिण्याचा प्रपंच मांडायची गरजच उरली नसती. आज नेमकी एका कंपनी सोडून जाणार्या सहकार्याचा निरोप समारंभ ठरला. आता आली का पंचाईत. आम्ही दोघींनी आमच्या व्रताच घोडं पुढे दामटवल. सुदैवाने आमचे इतर कुणी सहकारी मराठी नसल्याने आमची थाप पचली. आम्हाला आमच्या व्रतासाठी चालणारी फळं खायची मुभा मिळाली. पण समारंभ काही टाळता आला नाही. काही हरकत नाही असं म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि तिथूनच पुढच्या नाट्याला सुरुवात झाली.
आम्ही ज्या हॉटेलमधे गेलो होतो तिथे फळं ठेवली नव्हती. ज्यूस किंवा मिल्कशेक मिळत होते. पण ते आम्हाला चालणार नव्हते. समोर एकापेक्षा एक रुचकर पदार्थांची रेलचेल होती. त्यांचा जो सुवास दरवळत होता त्यामुळे रसना अधिकच जागृत झाली. पण आम्ही आमच्या निग्रहावर कायम होतो. अखेर सगळ्यांची जेवणं उरकायला 3 वाजले. जागृत झालेली रसना, सहकार्यांचे तृप्त चेहेरे आणि आपण आपल्या मार्गावरून न ढळल्याचं समाधान घेऊन आम्ही परत आलो. एव्हाना आमच्या दोघींचही डोकं जागृत व्हायला सुरुवात झाली होती. ते भुकेमुळे असणार याची आम्हाला खात्री होती. परत आल्या आल्या आम्ही आमचे डबे उचलले आणि कॅन्टीनमध्ये पळालो. आम्ही डब्यातून आणलेली फळं खाल्ली. आता थोड्या वेळातच डोकेदुखी थांबेल असं वाटलं.
पण प्रत्यक्षात मात्र उलटंच झालं. आमचा मस्तकशूळ वाढतच गेला. ऑफिस सुटल्यावर मैत्रीण गाडीतच झोपी गेली. पण ती मैत्रीला मात्र जागली. मला नेहेमीप्रमाणे कोपर्यावर न सोडता पूर्ण घरापर्यंत सोडलं. घरी आल्यावर मी पण आडवी झाले. थोडा वेळ पहुडल्यावर बरं वाटेल अशी आशा होती. आठ वाजता उठले. आता जरा मळमळायला पण लागलं होतं. मी मैत्रिणीला "आता काय करायचं?" असा SMS पाठवला. खूप वेळ वाट बघितली. पण काहीच उत्तर आलं नाही. अखेर मी माझ्या प्रणाला तिलांजली दिली आणि पराठा खाऊन घेतला. रात्री उशीरा मैत्रिणीचा निरोप आला "I quit" दुसर्या दिवशी कळल की तिला उलटी झाली. त्यानंतर तिचं खवळलेलं पित्त थार्यावर आलं. वर उत्तेजनार्थ आईकडून मुक्ताफळं ऐकायला लागली ती वेगळीच. अशा प्रकारे detoxification च वादळ एका दिवसातच ताटात परतलं.
दुसरं वादळ तर शमल. आता पुढे काय?? तिसरी लाट येऊन किनार्यावर थडकली. Pan ही लाट छोटीशीच होती. दुपारच्या जेवणातला गोड पदार्थ पसार झाला आणि त्याची जागा flavoured yogurt ने घेतली. दुपारचा चहा बंद केला. (त्याचं खरं कारण तुम्हाला सांगायला हरकत नाही. Vending machine चा चहा आवडत नाही आणि कॅन्टीनचा चहा बेचव असतो) कारण काही का असेना आता दुपारच्या चहाची जागा ग्रीन टीने घेतली. "Its so healthy you know... its rich with antioxidants" वगैरे संवाद ऐकायला यायला लागले. नुसता ग्रीन टी कडू लागतो म्हणून साखरेचे 2 cube टाकून तो प्यायला सुरुवात केली. एवढंच काय पण हवा बदल म्हणून गावाला गेलो ते सुद्धा माथेरानला. तिथे तशीही गाड्या न्यायला परवानगी नाही. किमान त्या निमित्ताने तरी थोडं चालणं होईल. बाकी सगळीकडे कसं शांत शांत होतं. पण ही शांतता वादळापूर्वीची ठरली.
मी नोकरी बदलली. नवीन ऑफिस मध्ये जिम होतं आणि एक आहारतज्ञही होती. शिवाय या दोन्ही सोयी मोफत उपलब्ध होत्या. त्यात एक फिटनेस फ्रीक सहकार मिळाली. अजून काय हव? आता आम्ही परत पेटून उठलो.
आहारतज्ज्ञ सल्ला घेतला. तिने दिवसभरासाठी एक जंत्रीच तयार करून दिली. प्रत्येक आहारात काय खायचं आणि काय नाही याची यादीच करून दिली. खाण्याच्या वेळा ठरवून दिल्या. मग काय हम कोई भी बाजी जान लगाकर खेलते है. त्यामुळे एकदम उत्साहाने हा नवा कार्यक्रम चालू झाला.
एक नवीन वही आणली. त्यामध्ये छान सुवाच्य अक्षरात आहारतज्ज्ञाने सांगितलेला आहार लिहून काढला. रोजची फूड डायरी लिहायला सुरुवात केली. एव्हाना तुम्हाला मी किती उपक्रमशील आहे ते समजलं असेलच! रोज जिम मध्ये व्यायाम करायला सुरुवात केली. पहिला आठवडा
"गाडी मे बैठे दो gymmers
गाडी मे इथे दुखत तिथे दुखत होय रे.." असे गेले. रोज काय पथ्यकारक खाल्लं आणि काय कुपथ्यकारक खाल्लं याची चर्चा केली. नेमाने संध्याकाळी डायट खाकर्याचा रवंथ चालू केला. इतक्या ढोल ताशांच्या गजरात नवीन उपक्रमाला सुरवात केल्यासारखी तीन आठवड्यात तीन किलो वजन कमी झालं. तीन किलो घट म्हणजे दर्या मे खसखस. तरी नारळ तर फुटला.
मी माझा आहार तर फार मनावर घेतला. त्याचा परिणाम म्हणून आता इतरांच्या ताटाकडे लक्ष जायला लागलं. समोरचा माणूस किती खातो he कधी मोजू नये असं आईने लहानपणापासून मनावर बिंबवलेल. आईची ही शिकवण कधीच गळून पडली. रस्त्यावरून जाताना 3-4 बायका एकमेकींशी Dairy Milk Cadbury ची देवाण घेवाण करताना दिसल्या. सगळ्या जणी कशा टम्म फुगलेल्या होत्या. त्यांना dairy milk खाताना बघून त्यांना सारखं सांगायची इच्छा होत होती, "बायांनो, आत्ता एव्हढ्या आनंदाने Cadbury खात आहात. पण त्या कॅलरी खर्च करायला किती मेहनत करायला लागेल ठाऊक आहे का?" पण मी स्वतःला कसंबस आवरलं.
आपण वजन कमी करत आहोत तर त्यामुळे आता इतरांच्या शरीरयष्टी कडे लक्ष जायला लागलं. आपण रस्त्यावरून जात आहोत आणि समोरून येणार्या जाणार्या प्रत्येकाकडे पाहून ती व्यक्ती वजनाने कमी आहे की जास्त असा विचार झर्रकन मनात येऊन जातो. कोण कुठून वाढलं आहे आणि त्याने ती चरबी उतरवण्यासाठी कुठला व्यायाम केला पाहिजे असाही विचार मनात तरळून जातो. भलत्या ठिकाणी नजर जाते. आता ही तर भलतीच आफत झाली. मनात विचारांचा वारू चौखूर उधळतो आणि मी त्याला लगाम घालण्याचा तोकडा प्रयत्न करत आहे. या सगळ्यातून काही भलता प्रसंग ओढवला नाही म्हणजे मिळवलं. हे ताटातल वादळ माझ्याच ताटात निवलं तर किती बरं होईल. थोडक्यात मी सध्या आहाराला आवर घालतीये, वजनाला आवर घालतीये, मनाला आवर घालतीये. सध्या एकंदरीत आवराआवरीचा माहोल आहे. जर ही आवराआवर यशस्वी झालीच तर परत येईन भेटीला "ऐरावत ते गजगामिनी" ची कथा घेऊन!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा